पुरुषोत्तम नवघरे, वणी : तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी वणी पोलिसांनी आता अंमली पदार्थांविरोधात मोहीम सुरू केली आहे. परिसरात गांजा, चरस, एमडी, हेरॉईन, कोकेन किंवा अन्य अंमली पदार्थांचा गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पोलीस विभागामार्फत अंमली पदार्थांविरोधात सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी आपल्या परिसरात गांजा, चरस, मेफेड्रोन (MD), हेरॉईन, कोकेन किंवा अन्य कोणत्याही अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक अथवा वितरण होत असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, ठिकाण, वाहन क्रमांक तसेच अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक कोणत्या वेळी व कोणत्या ठिकाणी होत आहे, याबाबत उपलब्ध माहिती पोलिसांना कळवावी. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती किंवा संकोच न बाळगता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देण्यासाठी संपर्क
उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी — 9356462406
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वणी — 9921794794
पोलीस सहायक निरीक्षक अमरनाथ नागरे — 9651514751
पोलीस सहायक निरीक्षक शिवाजी राठोड — 9422571589
पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद — 9822100094
अंमली पदार्थांच्या सेवनामुळे युवकांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होत असल्याने या गैरप्रकारांविरोधातील कारवाईसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या परिसरात अंमली पदार्थांशी संबंधित कोणताही प्रकार आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेत सहकार्य करावे, असे वणी पोलिसांनी म्हटले आहे.


Comments are closed.