बहुगुणी डेस्क, वणी: जुगाद शिवारात शेतात जाण्यासाठी पिढ्यानपिढ्या वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक रस्त्यावर तारांचे कुंपण घालून वहिवाट बंद करणे, काढलेले सोयाबीन नेण्यास अडवणूक करणे आणि जाब विचारणाऱ्या महिला शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ करत धमकावल्याची घटना 22 ऑक्टोबर 2026 रोजी घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी सुचिता दिलीप काळे (वय 32, रा. जुगाद) यांच्या मालकीची जुगाद शिवारात चार एकर शेती आहे. ही शेती त्यांनी बटईने मारोती आबाजी बोटपल्ले (रा. माथोली) यांना कसण्यासाठी दिली आहे. या शेतात तूर आणि सोयाबीनचे पीक घेण्यात आले आहे. सध्या सुमारे दोन लाख रुपयांचे सोयाबीन काढून शेतात जमा करण्यात आले होते.
काळे कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून शेजारील शेतातून जाणाऱ्या पारंपरिक मार्गाचा वापर करून आपल्या शेतात ये-जा करीत असल्याचे आहे. मात्र, पंढरीनाथ उरकुडे यांनी त्यांच्या शेताच्या धुऱ्यावरून जाणाऱ्या मार्गावर तारांचे कुंपण आणि साड्या बांधून रस्ता बंद केल्याचा आरोप आहे. त्यामुळे शेतातील पीक बाहेर काढण्यास अडथळा निर्माण झाला.
दरम्यान, शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेलेल्या मारोती बोटपल्ले यांना मंगेश पंढरीनाथ उरकुडे (वय 29, रा. जुगाद) याने रस्ता नसल्याचे सांगत शिवीगाळ केली आणि शेतमाल येथून नेऊ देणार नसल्याचे म्हटले.
यानंतर दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता सुचिता काळे स्वतः शेतात गेल्या असता त्यांनी पंढरीनाथ उरकुडे आणि त्यांचा मुलगा मंगेश यांना रस्ता अडविण्याबाबत विचारणा केली. यावेळी दोघांनी हा रस्ता तुमचा नाही, तुम्हाला येथून जाऊ देणार नाही, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. तसेच, येथून गेल्यास एखाद्या दिवशी पाहून घेण्याची धमकी दिली.
या प्रकरणी सुचिता काळे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी पंढरीनाथ उरकुडे आणि मंगेश पंढरीनाथ उरकुडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 126(2), 296, 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.


Comments are closed.