शाळेत जाते सांगून घरातून निघाली; 15 वर्षीय मुलगी बेपत्ता

अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी : वणी तालुक्यातील राजुर कॉलरी परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघालेली मुलगी शाळेत पोहोचली नसल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही शाळेत शिक्षण घेते. 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शाळेत जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, ती नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचली नाही आणि सायंकाळपर्यंत घरीही परतली नाही. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सर्वप्रथम तिच्या शाळेत चौकशी करण्यात आली. त्यावेळी संबंधित वर्गशिक्षकांनी ती त्या दिवशी शाळेत आलीच नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी राजुर कॉलरी परिसरासह आजूबाजूच्या भागात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही मुलगी मिळून आली नाही.

मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. 

Comments are closed.