बहुगुणी डेस्क, वणी: दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका इसमाने तरुणाच्या पोटावर चाकूने वार केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मांगरुळ येथे कृष्णा भैय्याजी भोयर (वय 29) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे मोहन मसगवळी याच्यासोबत सुमारे दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात होता. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास कृष्णा भोयर हे आपल्या मित्रांसोबत मारेगाव येथील त्रिवेणी बारजवळ रोडवर उभे होते. त्यावेळी मसगवळी तिथे आला व त्याने कृष्णा यांच्याशी वाद घातला. त्यानंतर कृष्णा व त्यांचे मित्र तेथून निघून गेले.
सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास कृष्णा हे राजगडकर यांच्या घराजवळ गेले असता, आरोपीने तेथे येऊन त्यांना धक्का दिला. यावर कृष्णा यांनी धक्का का मारला, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने त्याच्याजवळील कापण्याच्या चाकूने कृष्णा यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला वार केला. या घटनेनंतर गावातील नागरिक आणि मित्रांच्या मदतीने जखमी कृष्णा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कृष्णा भोयर यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


Comments are closed.